ज्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे अन् चांगले आदर्श ठेवून संस्कारही करायचे, ते शिक्षकच नको ते गुण उधळू लागले आहेत अन् विद्यार्थिनीच त्यांच्या बळी ठरत आहेत. या शिक्षकांवरच संस्कार करण्याची गरज असून, "डीएड' प्रवेशापासूनच अशी चाळणी लावावी लागेल. अन्यथा अमेरिकेतील एका शाळेने शिक्षकांना स्वसंरक्षणार्थ बंदूक वापरण्याची परवानगी दिली, तशी आपल्याकडे विद्यार्थिनींना बंदुका द्यायची मागणी झाली तर नवल वाटू नये.
शिक्षकाकडून मुलीचा विनयभंग, शिक्षकाकडून लैंगिक शोषण, शिक्षकाने केले अश्लील चाळे, शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचे अपहरण अन् अत्याचार... अशा बातम्या आता नेहमीच्याच झाल्या आहेत. यामध्ये कित्येक शिक्षक गजाआड गेले, तरीही या घटना कमी झालेल्या नाहीत. एका बाजूला त्यांच्या सहकारी संस्थांच्या सभेत, निवडणुकांत खालच्या पातळीवर येऊन गोंधळ घालणारे शिक्षक अन् दुसरीकडे वर्गात वावरताना "रोमिओ'सारखे वागणारे शिक्षक, असेच वातावरण सध्या झाले आहे. बिघडलेल्या समाजातही आपले वेगळेपण टिकवून समाज सुधारण्याचे काम गुरुजनांनी करायचे असते; परंतु काही शिक्षकांनी बिघडलेल्या घटकांपेक्षाही खालच्या स्तराला जाऊन आपणही त्यातलेच असल्याचे दाखवून दिले आहे.अर्थात काही शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण शिक्षकी पेशा बदनाम होत आहे.
"छडी लागे छम छम विद्या येई घम घम' हे वर्णन आता केवळ गाण्यात उरले. शिक्षकांच्या हातातील छडी गळून पडली आहे. असलीच तर तिचा धाक वेगळ्या कारणासाठी वापरला जातोय. शिक्षकांच्या डोक्यातील ज्ञानाची जागा वासनेने घेतली आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.एके काळी शिक्षकांबद्दल समाजात आदराचे स्थान होते. आताच्या पिढीत मात्र शिक्षकांकडे संशयाने पहावे, असे वातावरण झाले आहे. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या शिक्षकांवर टीका होणारा एक काळ होता. त्यानंतर राजकारणात गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांवर टीका होऊ लागली. अलीकडे अनेक शिक्षकांमध्ये नराधम संचारले असून, त्यांच्या वर्गातील विद्यार्थिनीच त्यांच्या बळी ठरत आहेत.
शिक्षकांचे हे वर्तन केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता भावी पिढीवर अनिष्ट परिणाम करणारा प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल. शाळेभोवती जमणारे टोळके विद्यार्थिंनीची छेडछाड करते, शाळेच्या शिक्षिकांची टवाळकी केली जाते. त्या मानाने शाळा हे सुरक्षित स्थान मानले जात होते; मात्र शाळेबाहेर घडणाऱ्या या घटना आता शाळेतही घडू लागल्या आहेत; कारण अनेक शिक्षकच आता "रोमिओ' संचारल्यासारखे वागू लागले आहेत. आपल्यासमोर बसलेल्या विद्यार्थिनी आपल्याला गुरू मानून ज्ञानार्जनासाठी आल्या आहेत, त्यांचे-आपले नाते वेगळे आहे, ही भावनाही असे "रोमिओ' विसरून जात आहेत.
गुरू-शिष्य नात्याचा खूनच नव्हे, तर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा गुन्हाही त्यांच्या हातून घडत आहे. एक-दोन नव्हे, अशा घटनांची मालिकाच सध्या सुरू असल्याने, या शिक्षकांना झालंय तरी काय, असा प्रश्न पडतो. ना वयाची लाज, ना पेशाचे भान, असे अनिर्बंध वर्तन करणाऱ्यांना शिक्षक म्हणायचे तरी कसे? त्यांच्यावर विश्वास ठेवून आपली मुले शाळेत पाठवायची तरी कशी, असे प्रश्न आता पालकांना पडू लागले आहेत. पालकांनी ठेवलेला विश्वास, विद्यार्थिंनीची निरागसता यांचा स्वतःला शिक्षक म्हणविणारे हे वासनांध गैरफायदा घेतात. शिक्षक हे याच समाजाचे घटक आहेत, समाजाचे प्रतिबिंब त्यांच्यावर पडणारच, हे जरी खरे असले, तरी शिक्षक म्हणून निवड करताना यापुढे शिक्षकांच्या गुणवत्तेबरोबर चारित्र्यही तपासून घ्यावे लागेल; कारण हा पेशा इतरांपेक्षा वेगळा आहे. समाज घडविण्याचे कामच त्यांना करायचे आहे. त्यामुळे अशा बिघडलेल्या लोकांच्या हातात समाजाचे भवितव्य देणे घातक ठरेल.
Wednesday, March 11, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment