Wednesday, March 18, 2009

विचारवंत बंड्या आणि त्याचा अडाणी बाप!

शाळा सुटली तसा बंड्या धावत घरी आला. आल्या आल्या दप्तर फेकून देऊन तडक वडिलांपुढे जाऊन उभा राहिला. त्याचा हा अवतार पाहून वडिलांनाही नवल वाटलं. ते काही बोलायाच्या आतच बंड्या म्हणाला, ""बाबा, मला ही तुमची इस्टेट नको, तुमचा पैसा अडकाही नको. त्याची मला गरज नाही. मला विचारवंत व्हायचं आहे, त्यामुळं मी हे स्वखुशीने नाकारत आहे.''आता कुठं सातवीत गेलेलं आपलं पोरगं हे काय बोलतंय? असा प्रश्‍न सदाभाऊला पडला. त्यांनी समजुतीच्या सुरात त्याला विचारलं, ""आरं असं काय बोलतोय, असं एकदम काय झालं तुला? ही इस्टेट तुझ्यासाठी नाही तर मग कुणासाठी? मी काय वर जाताना बांधून नेणार आहे.?'' त्यावर बंड्या तत्परतेने म्हणाला, ""नाही बाबा नाही. आपल्या देशातील जनता दारिद्य्रात पिचलेली असताना मी ही इस्टेट कशी घेऊ?''
आता मात्र पोराला काही तरी झालं, याची सदाभाऊला खात्री पटली. शाळेतून येताना नाल्यातून यावे लागते. तिथं तर काही बाधलं नाही ना, की आणखी दुसरं काय झालं. अशा नाही नाही त्या शंका सदाभाऊच्या डोक्‍यात येऊन गेल्या. म्हणून त्यानं बंड्याला जवळ घेतलं. शेजारी बसवून बोलता झाला. ""कारं पोरा, बरं नाही का आज? शाळेत काय झालं का? आरं आल्या आल्या असं का बोलतोय?'' बंड्या पुन्हा त्याच ठामपणाने म्हणाला, ""नाही बाबा, मला काहीही झालेलं नाही. मी पूर्ण शुद्धीत आहे. शुद्ध हरपली आहे ती इतरांची. गरज नसताना जादा पगार घेणाऱ्यांची, जादा इस्टेट कमावणाऱ्यांची. पण मी मात्र माझा मार्ग निवडला आहे. मला ही इस्टेट नको म्हणजे नको.'' पोराचा हा ठामपणा पाहून सदाभाऊ आणखीच गोंधळात पडला. पोरगं नीट सांगत नाही म्हटल्यावर त्याने बापाच्या अधिकारात त्याला एक धपाटा लावून विचारलं. ""काय ते नीट सांगतोस की, देऊ ठेवून दोन तीन?''
धपाटा बसल्यावर बंड्या जरा भानावर आला. ""बाबा, आमच्या शाळेच्या गुरुजींना सगळे विचारवंत म्हणतात. केवढं मोठे नाव आहे त्यांचं. त्यांनी सरकारने देऊ केलेली पगारवाढ नाकारली होती. केवढं कौतुक झालं त्यांचं. गेली कित्येक वर्षे त्यांचा बोलबाला झाला. त्यांच्यावर पेपरातून हे मोठे लेख लिहिले गेले. त्यांचेही किती तरी लेख छापून आले. आमच्या शाळेतसुद्धा ते लेख वाचून दाखवत. आमच्या वर्गातली वेडी मुलं त्यावेळी खुशाल झोपा काढीत होती. मी मात्र, कान देऊन सगळं ऐकत होतो.'' बंड्या उत्साहानं सांगत होता. त्याचं बोलणं मध्येच थांबवत सदाभाऊ म्हणाले, ""आरं त्याचा आता इथं काय संबंध?'' बंड्याचा उत्साह पुन्हा बळावला आणि तो पुढे सांगू लागला ""हो तेच तर सांगतोय मी. सरकारनं आता पुन्हा पगारवाढ द्यायची ठरविली आहे. त्यामुळं आमचे गुरुजी पुन्हा नको म्हणतायत. आणि हो आता ते एकटे नाहीत. त्यांच्यासोबत आणखी काही समविचारी गुरुजीपण आहेत. त्यांनी म्हणे सरकारला कळविलं आहे की आम्हाला तर नकोच पण इतरांनाही देऊ नका. लायकीप्रमाणेच पगार मिळाला पाहिजे, असा त्यांचा विचार आहे. सरकारचा विनाकारण खर्च होऊ नये, उरलेल्या पैशातून गरिबांचे कल्याण व्हावं, म्हणून ते असं सांगत आहेत. त्यामुळं मी ही ठरविलं आहे की आपणही इस्टेट मागायची नाही. तुम्ही खुशाल गरिबांना वाटून टाका.''
आता काय झालंय ते सदाभाऊला कळाले. त्याने कपाळावरच हात मारून घेतला आणि म्हणाला, ""आरं असं पगार अन्‌ इस्टेट नाकारून कोणी विचारवंत होतं काय? त्यानं घर कसं चालवायचं. घरच्यांचं खाणंपिणं शिक्षण कसं करायचं. का त्यासाठी पुन्हा एखादी सरकारी योजना हुडकून त्यात नाव द्यायचं? आरं विचारवंत होणं इतकं सोपं असतं का गड्या. हे खूळ तू डोक्‍यातून काढून टाक.''आपला मुद्दा वडिलांना पटतं नसल्याचे पाहून बंड्या जरा चिडलाच. तो म्हणाला, "" हाच फरक आहे सामान्य माणूस आणि विचारवंत यांच्यातला. तुम्ही सामान्य माणसं विचारच करू शकत नाहीत. आजची शिक्षण पद्धती चुकीची आहे. वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम. सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. नवीन प्रयोग करण्याची कोणाची इच्छा नाही. नवे प्रयोग ग्रामीण भागात पोचत नाहीत. शिक्षक केवळ पगारामागे धावतात. शिकवण्याकडं त्यांचं लक्ष नाही. अशा स्थिती आपली शिक्षण व्यवस्था अडकली आहे. अन्‌ त्याच असे तुमच्यासारखे पालक. मुलांना स्वतंत्र विचार करू देत नाहीत, त्यांच्यावर विचार व इच्छा लादतात. छे छे कसं व्हायचं या देशाचं?...'' बंड्याने आपल्या भाषणात पॉज घेताच सदाभाऊ बोलते झाले, ""आता जरा माझं ऐकतो का? तू एवढं टमाटमा बोलाय शिकला ते ह्याच शिक्षणामुळं ना. तुझा तो मास्तर बी याच शिक्षण पद्धतीतून शिकला ना? तू म्हणतो तसं विचारवंत जर याच शिक्षणातून होत असतील तर या पद्धतीला कशाला दोष देता रं? नांगर आडवा हाकल्यावर मशागत चांगली होत नसलं तर आमी त्यो उभा हाकला तर लगीच विचारवंत झालो का आमी? मी नांगर उभा हाकला तर इतरांनी पण त्यो तसाच हाकावा असं कसं म्हणायचं. त्यो काय स्टॅंडर्ड झाला काय? आरं अशी नांगर हाकायची वेळ येऊ नाही म्हणून तुला शाळेत घातला. म्हटलं पोरगं शिकून मोठं होईल, दोन पैसे मिळविल. त्याच्याबरोबर आपून बी सुखी होऊ. पण तू हे भलतंच काय घेऊन बसलाय. तुला एक सांगू का? असं कोणी पगार अन्‌ इस्टेट नाकारल्यानं देशाची गरिबी हटणार नाही. त्यासाठी सगळ्यांना कमवायला शिकवलं पाहिजे. सगळे कमावते झाले की, गरीब आपोआप हाटलं बघ. त्यासाठी ज्यानी त्यानी आपलं काम आधी नीट केलं पाहिजे. कसं? पटतंय का तुला? आता मी पण नाही का वाटत विचारवंत?''
शेतात नांगर हाकणाऱ्या आपल्या वडिलांचे हे विचार ऐकून बंड्यातला विचारवंत ओशाळलाच. मघाशी फेकून दिलेलं दप्तर उचलून तो घरात पळाला.

Wednesday, March 11, 2009

गुरुजी, कोठे गेली तुमची छडी

ज्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे अन्‌ चांगले आदर्श ठेवून संस्कारही करायचे, ते शिक्षकच नको ते गुण उधळू लागले आहेत अन्‌ विद्यार्थिनीच त्यांच्या बळी ठरत आहेत. या शिक्षकांवरच संस्कार करण्याची गरज असून, "डीएड' प्रवेशापासूनच अशी चाळणी लावावी लागेल. अन्यथा अमेरिकेतील एका शाळेने शिक्षकांना स्वसंरक्षणार्थ बंदूक वापरण्याची परवानगी दिली, तशी आपल्याकडे विद्यार्थिनींना बंदुका द्यायची मागणी झाली तर नवल वाटू नये.
शिक्षकाकडून मुलीचा विनयभंग, शिक्षकाकडून लैंगिक शोषण, शिक्षकाने केले अश्‍लील चाळे, शिक्षकाकडूनच विद्यार्थिनीचे अपहरण अन्‌ अत्याचार... अशा बातम्या आता नेहमीच्याच झाल्या आहेत. यामध्ये कित्येक शिक्षक गजाआड गेले, तरीही या घटना कमी झालेल्या नाहीत. एका बाजूला त्यांच्या सहकारी संस्थांच्या सभेत, निवडणुकांत खालच्या पातळीवर येऊन गोंधळ घालणारे शिक्षक अन्‌ दुसरीकडे वर्गात वावरताना "रोमिओ'सारखे वागणारे शिक्षक, असेच वातावरण सध्या झाले आहे. बिघडलेल्या समाजातही आपले वेगळेपण टिकवून समाज सुधारण्याचे काम गुरुजनांनी करायचे असते; परंतु काही शिक्षकांनी बिघडलेल्या घटकांपेक्षाही खालच्या स्तराला जाऊन आपणही त्यातलेच असल्याचे दाखवून दिले आहे.अर्थात काही शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे संपूर्ण शिक्षकी पेशा बदनाम होत आहे.
"छडी लागे छम छम विद्या येई घम घम' हे वर्णन आता केवळ गाण्यात उरले. शिक्षकांच्या हातातील छडी गळून पडली आहे. असलीच तर तिचा धाक वेगळ्या कारणासाठी वापरला जातोय. शिक्षकांच्या डोक्‍यातील ज्ञानाची जागा वासनेने घेतली आहे, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.एके काळी शिक्षकांबद्दल समाजात आदराचे स्थान होते. आताच्या पिढीत मात्र शिक्षकांकडे संशयाने पहावे, असे वातावरण झाले आहे. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या शिक्षकांवर टीका होणारा एक काळ होता. त्यानंतर राजकारणात गोंधळ घालणाऱ्या शिक्षकांवर टीका होऊ लागली. अलीकडे अनेक शिक्षकांमध्ये नराधम संचारले असून, त्यांच्या वर्गातील विद्यार्थिनीच त्यांच्या बळी ठरत आहेत.
शिक्षकांचे हे वर्तन केवळ एक गुन्हा म्हणून न पाहता भावी पिढीवर अनिष्ट परिणाम करणारा प्रकार म्हणून त्याच्याकडे पाहावे लागेल. शाळेभोवती जमणारे टोळके विद्यार्थिंनीची छेडछाड करते, शाळेच्या शिक्षिकांची टवाळकी केली जाते. त्या मानाने शाळा हे सुरक्षित स्थान मानले जात होते; मात्र शाळेबाहेर घडणाऱ्या या घटना आता शाळेतही घडू लागल्या आहेत; कारण अनेक शिक्षकच आता "रोमिओ' संचारल्यासारखे वागू लागले आहेत. आपल्यासमोर बसलेल्या विद्यार्थिनी आपल्याला गुरू मानून ज्ञानार्जनासाठी आल्या आहेत, त्यांचे-आपले नाते वेगळे आहे, ही भावनाही असे "रोमिओ' विसरून जात आहेत.
गुरू-शिष्य नात्याचा खूनच नव्हे, तर अनेकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करण्याचा गुन्हाही त्यांच्या हातून घडत आहे. एक-दोन नव्हे, अशा घटनांची मालिकाच सध्या सुरू असल्याने, या शिक्षकांना झालंय तरी काय, असा प्रश्‍न पडतो. ना वयाची लाज, ना पेशाचे भान, असे अनिर्बंध वर्तन करणाऱ्यांना शिक्षक म्हणायचे तरी कसे? त्यांच्यावर विश्‍वास ठेवून आपली मुले शाळेत पाठवायची तरी कशी, असे प्रश्‍न आता पालकांना पडू लागले आहेत. पालकांनी ठेवलेला विश्‍वास, विद्यार्थिंनीची निरागसता यांचा स्वतःला शिक्षक म्हणविणारे हे वासनांध गैरफायदा घेतात. शिक्षक हे याच समाजाचे घटक आहेत, समाजाचे प्रतिबिंब त्यांच्यावर पडणारच, हे जरी खरे असले, तरी शिक्षक म्हणून निवड करताना यापुढे शिक्षकांच्या गुणवत्तेबरोबर चारित्र्यही तपासून घ्यावे लागेल; कारण हा पेशा इतरांपेक्षा वेगळा आहे. समाज घडविण्याचे कामच त्यांना करायचे आहे. त्यामुळे अशा बिघडलेल्या लोकांच्या हातात समाजाचे भवितव्य देणे घातक ठरेल.

Sunday, March 8, 2009

मुलांना मारता? शिक्षकांनो सावधान...

अभ्यास करत नाहीत किंवा शिस्तीत वागत नाहीत म्हणून शिक्षक यापुढे विद्यालयीन मुलांना शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्याही शिक्षा करू शकणार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने 2000 साली एका निवाड्याद्वारे शिक्षकांनी तसे करण्यास बंदी घातली आहे. गोव्याच्या शिक्षण खात्याने या निवाड्याचा हवाला देऊन शिक्षकांना त्यादृष्टीने सतर्क करणारे परिपत्रक जारी करून ते नुकतेच सर्व विद्यालयांना पाठवून दिले आहे. विद्यार्थ्यांना गुडघ्यावर उभे करणे, शिक्षा म्हणून मैदानावर धावायला लावणे, खूप वेळ उभे ठेवणे, चिमटे काढणे, थोबाडीत मारणे, मुलांचा लैंगिक छळ करणे आदी शिक्षेमुळे मुले घाबरतात. काहीवेळा विद्यार्थी घाबरूनच शाळा सोडतात. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांना विद्यालयात शिक्षा करण्यास बंदी घातली असल्याचे शिक्षण संचालक श्रीमती सेल्सा पिंटो यांनी परिपत्रकात नमूद केले आहे. अति शिक्षेमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावरून लक्ष उडणे शक्‍य आहे, यावरही पिंटो यांनी बोट ठेवले आहे. कोणत्याही प्रकारच्या विद्यालयात विद्यार्थ्यांना होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्यांना सामाजिक संस्थांचा आधार घेता येईल. प्रत्येक शाळेत "तक्रार पेटी' लावलेली असावी. या पेटीत विद्यार्थी आपल्या तक्रारी टाकू शकतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. पालक - शिक्षक संघाची महिन्यातून एकदा तरी बैठक व्हावी आणि मुलांच्या तक्रारींवर बैठकीत चर्चा व्हावी. विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यास बंदी असल्यासंदर्भात पालक व शिक्षकांना जागृत करणे हे पालक - शिक्षक संघाचे काम आहे, असेही शिक्षण खात्याचे म्हणणे आहे.

मी गण्या पेंडभाजे

मी गण्या पेंडभाजे, शाळेत शेवटच्या बाकावर बसणारा. मास्तरांच्या छड्या खाल्लेला. त्यामुळेच मास्तरांवर विशेष लक्ष असलेला. विद्यार्थी चुकला तर मास्तर त्याला छडी मारतात. पण मास्तर चुकले तर त्यांना छडी कोणी मारायची. म्हणून ही प्रेमाची छडी.. गुरुदक्षिणाच म्हणाना.